सोलापूर -जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजितकुमार नागेश देशपांडे यांची भारत सरकारच्या कृषी विभागाच्या हैदराबाद येथील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅंट हेल्थ मॅनेजमेंट' या संस्थेवर जनरल काउन्सिलवर सभासद म्हणून नियुक्ती झाली आहे.
डॉ. देशपांडे यांनी आजपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये केलेले संशोधन, शिक्षण आणि विस्तार या तिनही क्षेत्रामध्ये जे भरीव योगदान दिले आहे. त्याची विशेष दखल भारत सरकारने घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅंट हेल्थ मॅनेजमेंट या संस्थेच्या काउन्सिलवर तीन वर्षासाठी डॉ. देशपांडे यांची नियुक्ती केली आहे.
डॉ. देशपांडे यांनी यापूर्वी कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे सहयोगी संशोधन संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ या पदावर काम केले आहे. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. व शेवटी सहयोगी अधिष्ठाता या पदावरून 2013 साली ते निवृत्त झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वडाळा या गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. एप्रिल महिन्यात डॉ. देशपांडे यांचा भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातून डेटा मागविण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्लॅंट हेल्थ मॅनेजमेंट हैदराबाद या संस्थेतर्फे डॉ. देशपांडे यांना त्यांची जनरल काउन्सिल सभासद म्हणून नियुक्ती केल्याचे मेलद्वारे कळविण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.