पंढरपूर (सोलापूर) -कार्तिकी वारीनिमित्ताने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये 24 नोव्हेंबर ते ते 26 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी असणार आहे. आषाढी वारी कालावधीत ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदी केली होती, त्याचप्रमाणे कार्तिकी वारीलाही जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर आणि पंढरपूर शहर स्तरावर नाकाबंदी असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. तर याबाबत पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
एसटी सेवे बाबत संभ्रम
पंढरपूरकडे येणाऱ्या आणि पंढरपूरवरून जाणाऱ्या एसटी बससेवाही 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या तरी बससेवा सुरूच रहाणार असल्याचे सांगितले. मात्र वाढती गर्दी लक्षात घेता संबधित विभागाने बस सेवा बंद ठेवण्या बाबत निर्णय घ्या तसा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कालावधीत बस सेवा सुरू रहाणार की नाही या बाबत संभ्रम आहे.
कार्तिक वाढीसाठी अठराशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारीच्या नियोजना प्रमाणेच कार्तिक वारीचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूरमध्ये सुरक्षिततेसाठी सुमारे 1800 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेकेडिंग करून घ्यावे तसेच मंदिर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंडिंग करावे, वारी कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचेही अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.