पंढरपूर -राज्यातील सर्व धार्मिकस्थळे 7 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुले करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मुखदर्शन सुरू होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचे दररोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. यामध्ये 50% ऑनलाइन ऑफलाइन अशा पद्धतीचे दर्शन असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील इतर धार्मिक स्थळांसह विठ्ठल-रुक्मिणी मंदीर उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. आज (मंगळवारी) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी घटस्थापनेच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडणार आहे. याबाबत विठ्ठल मंदिर समितीतील सदस्य व प्रशासनातील मंडळींबरोबर विचार विनिमय करण्यात आला.
तासाला 700 ते 800 भाविकांना दर्शन मिळणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांसाठी मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये एका तासात सुमारे 700 ते 800 भाविकांना मुखदर्शन दिले जाणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. दररोज किमान दहा हजार वारकरी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पंढरपूरकरांसाठी दर्शन खुले असणार आहे. तसेच येणाऱ्या 65 वर्षीय व्यक्ती व गर्भवती महिलांसाठी शासनाने दिलेल्या नियमानुसार दर्शन दिले जाणार आहे.