सोलापूर - नवीन शैक्षणिक वर्षातील आज शाळेचा पहिला दिवस असल्याने सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुगे, चॉकलेट वाटून आणि टिळा लावून तर एवढेच नव्हे पेढे-लाडू वाटून या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याचवेळी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 805 शाळा आहेत. त्यात जवळपास 20 लाख 9 हजार 510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून, सध्या अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना निरनिराळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथे बैलगाडी सजवून मुलांना शाळेत आणण्यात आले.