पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ व माढा नगरपंचायतच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मोहोळ, माढा आणि माळशिरस तालुक्यावर आता प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. विभागाकडून प्रातांधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नगर पंचायत निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे पुणे येथील नगरपालिका उपायुक्तांनी या नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासक नगरपंचायतीचा कारभार पाहणार
जिल्ह्यातील मोहोळ, माळशिरस, माढा नगरपंचायतच्या कार्यकारी मंडळाची मुदत एप्रिल महिन्यात संपली आहे. त्यानंतर निवडणुका होऊन त्याठिकाणी नवीन कार्यकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे होते. मात्र राज्यासह जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेतील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेता येणार नाहीत. त्यामुळे तिन्ही नगरपंचायतच्या निवडणुका न घेता त्यांच्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील सहा महिने प्रशासक नगरपंचायतचा कारभार पाहणार आहे.
कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या-
सध्या कार्यरत विद्यमान पदाधिकार्यांना कायद्याने मुदतवाढ देता येत नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या नगरपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी त्या-त्या विभागातील प्रांताधिकार्यांच्या तात्काळ नेमणुका करण्याच्या सूचना पुणे विभागीय नगरपालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालेला आहे. अशा परिस्थितीत निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे या तिन्ही नगरपंचायतची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुकांच्या आनंदावर विरजन पडले आहे.