पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले असून, मतमोजणीसाठी 118 अधिकारी - कर्मचारी व मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पूर्व तयारीबाबत शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अशी असणार मतमोजणी प्रक्रिया
पोटनिवडणूकीतील मतमोजणी रविवार 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. 14 टेबलांवर 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाची मोजणी दोन टेबल होणार आहे. यासाठी दोन टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 54 अधिकारी, कर्मचारी व मदतनीस राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाव्दारे 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी 3 हजार 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच 73 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचेही गुरव यांनी सांगितले आहे.
कोरोना चाचणी बंधनकारक
मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केली नाही अशांसाठी मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाणार आहे. तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्यास तरच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता मतमोजणी कक्षा बाहेरील क्षेत्रात फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनीक्षेपकाव्दारे जाहीर करण्यात येणार नाही.
मतमोजणी केंद्रात घेतली जाणार काळजी
मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच याठिकाणी व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रिकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतमोजणी केंद्रात आवश्यकती काळजी घेण्यात आली असून, यासाठी आरोग्य सुविधा कक्ष, प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष, तसेच आपत्कालीन परिस्थित सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात करण्यात आले असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले आहे.