सोलापूर - राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विविध संघटना शासनाकडे सातत्याने निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. या मागण्या मान्य होत नसल्याने राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामान्य शाखेसमोर महसूल कर्मचाऱ्यांनी धरणे देत बुधवारी आंदोलन केले.
या कामकाजांवर परिणाम
सोलापुरातील महसूल कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम, सिव्हिल हॉस्पिटल, राज्य कामगार रुग्णालय, कोषागार कार्यालय, भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालय, जिल्हा कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण, अन्न व औषध प्रशासन, वन विभाग, उप प्रादेशिक कार्यालय, राज्य विक्रीकर कार्यालय, समाज कल्याण विभाग यासह आदी राज्य सरकारी कार्यालयात कामकाज बंद होते. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयासमोर शुकशुकाट होता.
...तर शिस्तभंगाची कारवाई
राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना तातडीने लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून ( बुधवार ) पुकारण्यात आलेला दोन दिवसांचा लाक्षणिक संप बेकायदा आहे. यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी दिला आहे.
राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी शंतनू गायकवाड माहिती देताना या आहेत मागण्या -
- राज्यात वर्ष 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
- केंद्राच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजनेतील सर्व सुविधा लागू कराव्यात.
- गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांना विनाअट अनुकंपा तत्वावर शासन सेवेत सामावून घ्यावे.
- रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने न भरता नियमित वेतनश्रेणीनुसार भरावीत.
- केंद्र व अन्य राज्या प्रमाणे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे.
- सातव्या वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हफ्ता तातडीने प्रदान करावा.
- महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
हेही वाचा -Somaiya On Malik : महाराष्ट्राला घोटाळे मुक्त करणार - किरीट सोमय्या