पंढरपूर (सोलापूर) -सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 3 हजार 214 नागरिकांकडून 13 लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उल्लंघन करणाऱ्या 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
सोलापूर; कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई; १३ लाख रुपयांचा दंड वसूल - पंढरपूर कोरोना न्यूज
काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर करावा , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे, प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाययोजना
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.तसेच संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्यावतीने शहर व ग्रामीण भागात जनजागृती करुन मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदीबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई
1 जानेवारी ते 12 मार्च 2021 या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 59 नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. त्यातून 13 लाख 32 हजार 700 रुपये व गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 155 नागरिकांकडून 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यातंर्गत कलम 188 अन्वये 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही कदम यांनी दिली.
प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आव्हान
काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर करावा , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे, प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, जे नागरिक कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक तसेच साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी यावेळी दिला आहे.