माळशिरस (सोलापूर) -तालुक्यातील लवंग येथील एका मुलीला लग्न करण्यासाठी बनावट मंडल कृषी अधिकारी असल्याचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलींनी तोतया मंडल कृषी अधिकाऱ्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महेश जगदाळे (रा. घोरपडवाडी ता. इंदापूर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
बनावट कागपत्रे दाखवून केली फसवणूक
सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीवेळी महेश जगदाळे हा माळशिरस तालुक्यातील लवंग गावातील मुलीला लग्नासाठी मागणी घातली. लग्न ठरवताना महेश जगदाळेने बीएससी ॲग्री शिक्षण असून कोल्हापूर येथे मंडळ कृषी अधिकारी असल्याचे सांगितले. याबबतची बनावट कागदपत्रेही दाखवली होती. आपल्याजवळ कराड व बारामती या शहरात दोन प्लॉट, चार एकर जमीन, दोन ट्रक, एक जेसीबी मशीन असल्याचा बनाव केला. लग्नानंतर मुलीला महेश जगदाळे हा कोणत्याही प्रकारचे काम व नोकरी करत नसल्याचे समजले. त्यामुळे मुलीची फसवूक झाल्याचे मुलींच्या नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.