सोलापूर -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, पालकमंत्री दत्ता भरणे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 15 फूट उंचीचे हे स्मारक ब्राँझ धातूपासून बनविले जाणार आहे. त्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षीत आहे, असंही यावेळी दत्ता भरणे यांनी म्हटले आहे. ते कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
सोलापूर विद्यापीठाचे नामांतर झाल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी हे स्मारक उभे केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी या हेतूने विद्यापीठात स्मारक उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्त करण्यात आली होती. आज या समितीची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दत्ता भरणे, कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस, समितीचे सदस्य चेतन नरोटे, सारिका पिसे, बाळासाहेब शेळके, अस्मिता गायकवाड यांची उपस्थिती होती.