सोलापूर -मटका व्यवसायातील भागीदार स्टीफन नेल्सन स्वामी याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. मटका व्यवसायात पोलिसच भागीदार असल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
अशोक चौक जवळील पोषम्मा मंदिराजवळ असलेल्या न्यू पाच्छा येथे मोठा प्रमाणात मटका चालत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी 24 ऑगस्टला न्यू पाच्छा पेठ येथील मटका अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये मोठी धावपळ देखील झाली, यामध्ये परवेज इनामदार या व्यक्तीचा मृत्यू देखील झाला. या मृत्यमुळे प्रकरणाची गंभीरता वाढत गेली. यानंतर पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत सविस्तर आढावा घेतला. दरम्यान, या मटका अड्ड्याचा समूळ नायनाट करण्यासाठी कारवाईचा बडगा उचलला गेला. घटनास्थळावरून संशयित आरोपींना ताब्यात घेतले गेले. यानंतर या अड्ड्याचा मूळ मालक कोण आहे, याची सविस्तर माहिती घेतली गेली. यात भाजपाचा विद्यमान नगरसेवक सुनील कामाठी व पोलीस खात्यामधील पोलीस शिपाई स्टीफन नेल्सन स्वामी या अड्ड्याचा मूळ मालक असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेला पोलीस शिपाई स्टीफन स्वामीला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली.