सोलापूर- पंढरपूर येथील एका पत्रकाराने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिराज उबाळे, असे या पत्रकाराचे नाव आहे. फेसबुक लाईव्ह केल्यानंतर त्यांनी रोगर विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी स्थानिक राजकीय नेता, एक महिला, एक पत्रकार आणि एका पोलीस निरीक्षकाच्या विरोधात तक्रार दिली आहे.पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
राजकीय नेता, पत्रकार आणि पोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न - pravin sapkal
पंढरपूर येथील एका पत्रकाराने राजकिय नेते, पोलीस निरीक्षक, पत्रकार आणि महिलेच्या त्रासास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आपली व्यथा फेसबूकच्या माध्यामातून मांडली.
अभिराज उबाळे (छाया - सोशल मिडीया)
अभिराज उबाळे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची व्यथा मांडत आत्महत्येचा प्रयत्न केला. पंढरपुरातील आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू आणि स्थानिक नेते उमेश परिचारक, पंढरपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह काही जण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत त्रास देत असल्याचा आरोप अभिराज यांनी केला होता. त्याचा आता तपास सुरु आहे.