महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मलवडीत मुलाला वाचविताना वडील व मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू - sarthak shivaji kondalkar death case news

करमाळा तालुक्यातील मलवडी येथे वडील आणि मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

वडील व मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

By

Published : Nov 10, 2019, 12:36 PM IST

सोलापूर- करमाळात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील मलवडी येथे वडील आणि मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ज्या विहिरीत बुडून सार्थक आणि त्याचे वडील शिवाजी कोंडलकर यांचा मृत्यू झाला, त्या विहिरीचे दृश्ये

मलवडीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोंडलकर वस्ती आहे. सार्थक उर्फ सोन्या शिवाजी कोंडलकर (वय ११) हा सदर वस्तीसमोर २०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत पोहायला गेला होता. विहिरीत पोहताना त्याच्या पाठीवर ड्रम बांधले होते. दरम्यान पोहताना सार्थक याच्या पाठीवरील प्लास्टिकच्या ड्रमची दोरी निसटली व तो पाण्यात बुडू लागला. हे पाहून त्याचे वडील शिवाजी यांनी पाण्यात उडी मारून सार्थकला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण घाबरलेल्या सार्थकने वडिलांच्या गळ्याला मिठी मारली व त्यात ते दोघे विहिरीतील खोल पाण्यात बुडाले.

पोहायला गेलेला सार्थक आणि त्याचे वडील बऱ्याच काळापासून आले नसल्याने चिंतीत झालेल्या शिवाजी यांच्या पत्नी रेश्मा विहिरीकडे त्यांना पाहायला गेल्या. रेश्मा यांना विहिरीच्या काठावर त्यांचे पती व मुलगा यांचे कपडे आढळले. त्यानंतर मलवडी वस्तीवरील गावकऱ्यांनी विहिरीजवळ गर्दी करून विहिरीतील पाणी शेती पंपाच्या सहायाने तीन ते चार तास उपसा करून बाप-लेकाच्या मृतदेहाला पाण्याबाहेर काढले. या घटनेमुळे मलवडी गावावर शोककळा पसरली आहे. सदर घटनेबाबत माजी सरपंच चंद्रभान पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. शिवाजी यांच्या पश्‍चात आई-वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रणदिवे करत आहेत.

हेही वाचा-करमाळ्यातील एरंडा पिकाचे नुकसान; शेतकऱ्याला लाखोंचा तोटा

ABOUT THE AUTHOR

...view details