सोलापूर- मंगळवारी (दि. 25 मे) शहर आणि जिल्ह्यात 965 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 3 हजार 288 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर ग्रामीणमधील 22 व शहरातील 6 रुग्णांचा, असे एकूण 28 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागासाठी चिंताजनक बनली आहे. मागील 40 दिवसांत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जवळपास 60 हजार रुग्ण वाढले आहेत. आजतागायत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1 लाख 18 हजार 913 व्यक्ती कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शहरात देखील आजतागायत 27 हजार 964 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. शहर आणि जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या सद्यस्थितीत 1 लाख 46 हजार 877 झाली असून त्यापैकी एक लाख 31 हजार 644 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सोलापुरात चाचण्या झाल्या कमी
शहर व ग्रामीण भागातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये दररोज दहा हजारांवर तर शहरात तीन हजारांपर्यंत कोरोना चाचण्या होत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून त्यात घट झाली असून त्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.