सोलापूर -गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांची जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी अखेर सुटका केली आहे. गेल्या २ वर्षांपासून या नऊ जणांना सोलापूर जिल्ह्यातील बाधलेवाडी या ठिकाणी ऊस तोड मुकादमासह त्याच्या सासऱ्याने बंधक करून ठेवले होते. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने सुटका -
जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने बंधक असलेल्या ९ जणांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी ऊस तोड मुकादम भरत आलदार आणि डिगांबर माने या बंधक बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास सोलापूर पोलीस करणार आहेत.