पंढरपूर (सोलापूर)-आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या एक दिवसावर आला आहे. आषाढीच्या महापुजेसाठी आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात दाखल होत आहेत. मात्र, अशातच कोरोनाचा संसर्ग पंढरीत वाढला आहे. विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा रोड भागासह जवळपासच्या परिसरात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हा भाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
मंदिर प्रदक्षिणा परिसरात कोरोनाचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण मंदिर व जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आषाढी वारीच्या सुरक्षेच्या कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरवर्षी पंढरी आषाढी वारीला वैष्णवाचा मेळा मोठ्या प्रमाणावर भरत असतो. पण कोरोनाच्या महामारीमुळे यंदाचा आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे.
आज आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्यांसह प्रत्येकी 20 वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत. प्रत्येक वर्षी एकादशी दिवशी नगरप्रदक्षिणा करण्यात येतात. मात्र, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, जुनी पेठ परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नगरप्रदक्षिणा होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा होणार आहे. आज दुपारपासून पंढरपुरात संचारबंदी लागू झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरीत भाविकांना येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या धार्मिक कार्यक्रमाला पास असणाऱ्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.