सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानामध्ये ६३.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे माढा विधानसभा मतदारसंघात झाले. माढ्यात ६९.५२ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान हे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. माण-खटावमध्ये ५७.११ टक्के मतदान झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मोठ्या चुरशीने मतदान झाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७० टक्केच्या आसपास मतदान झाले आहे. तसेच संजयमामा शिंदे यांनी कार्यक्षेत्र बनविलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात देखील ६२.४० टक्के मतदान झाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या साठी फायदेशीर ठरणाऱ्या माण-खटाव मतदारसंघात मात्र मतदान कमी झाले आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात ५७.११ टक्के मतदान झाले आहे.