सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्हा एकीकडे अनलॉक होत आहे. मात्र दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढ कमी होत नाही. आज (रविवारी) एकाच दिवसात सोलापुरात 479 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 23 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आज 457 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर शहरात फक्त 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून सोलापूर शहरात नियम व अटी लादून अत्यावश्यक व विना अत्यावश्यक सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच सोलापुरच्या ग्रामीण भागात देखील अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सोलापूर शहर अहवाल
महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने सोलापूर महानगरपालिका हद्दीत 2967 संशयितांची तपासणी केली. त्यामध्ये फक्त 22 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधा झालेल्या मध्ये 15 पुरुष आणि 7 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील महानगरपालिका हद्दीत रविवारी 6 जून रोजी फक्त 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात 36 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरातील विविध रुग्णालयात आता ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड रिकामे झाले आहेत. फक्त 284 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.