सोलापूर- कोरोनाची बाधा झाल्याने सोलापुरात एका ज्येष्ठ वकील व एका गिरणी कामगारांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. हे सर्व मृत साठीच्या पुढचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वृद्धावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी (दि. 10 जून) दिवसभरात महापालिका हद्दीत 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 310 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेले जेष्ठ वकील हे 89 वर्षांचे होते. स्वप्नपूर्ती सर्वोदय हौसिंग सोसायटी परिसरातील घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागला होता. त्यांनी खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण, त्यांची प्रकृती न सुधारल्याने त्यांना शहरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा एक्स-रे काढला असता, यावेळी त्यांना न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट झाले.
भारतरत्न इंदिरानगर येथील गिरणी कामगार 63 वर्षांचे होते. त्यांची यापूर्वी ऍन्जिओग्राफी झाली होती. त्यांच्यावरही अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. रामराज्यनगर, शेळगी येथील महिला 67 वर्षांची होती. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे यापूर्वी तीन वेळा डायलिसिस करण्यात आले होते. या वयोवृद्ध तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.