सोलापूर- शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसाच्या आठवड्याचा सोमवारी (दि. 2 मार्च) पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी सोलापूर महानगर पालिकेतील 350 कर्मचारी लेटकमर (उशिरा कर्तव्यावर आलेले) असल्याचा प्रकार खुद्द महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे यांनी उघड केली आहे. त्या सर्वांना शो-कॉज नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे कामाच्या वेळेपेक्षा कार्यपद्धती सुधारावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य सोलापूरकरांनी व्यक्त केली.
केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यांतील शनिवारी आणि रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर नियमित वेळापत्रकांत बदल करून 45 मिनिटांचे वाढीव काम राज्य कर्मचारी आणि अधिकारी यांना करावे लागणार आहे. या महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा काल पहिला दिवस होता. त्याची सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्तांनी आपल्या कार्यालयात 20 मिनिटे आधीच हजेरी लावत झाडाझडती घेतली. त्यात लेटकामर कर्मचाऱ्यांची कार्यशैली उघड झाली.