सोलापूर- उजनीच्या अथांग जलाशयात मच्छिमारांना मासे सापडत नसल्याने मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे. त्यातच भिमानगर येथील उजनी धरणाजवळील भराव्यावर सोमवारी मच्छिमारांना चक्क मगर आढळून आली. जलाशयातील मगरीला पकडण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले असून तिला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, मगर आढळल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मगरीला भराव्यावरून पाण्यात जाता येत नसल्याने ती त्यात अडकली होती. मच्छिमारांना मगर दिसताच त्यांनी आपल्या साथीदारांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून मगरीला दोरीच्या व जाळीच्या सहायाने पकडले. त्यानंतर पकडलेल्या मगरीबाबत वन अधिकाऱ्यांना महिती देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगर आपल्या ताब्यात घेतली असल्याचे समजले आहे.