सोलापूर- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १८२ तर मृतकांची संख्या ११ इतकी झाली आहे. काल एका दिवसात २९ जणांना कोरोनाची लागण झाली असून आजपर्यंत शहरात एकूण २ हजार ७७५ जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली आहे. यातील २ हजार ४९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील २ हजार ३१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गुरुवारी एका दिवसात कोरोनाचे १२६ अहवाल प्राप्त झालेत. यातील ९७ अहवाल निगेटिव्ह तर २९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात १४ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज ५ जणांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयाने त्यांना सुट्टी दिली आहे, तर केगाव येथून विलगीकरण केंद्रातून २४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज जे २९ रुग्ण आढळलेत, यात आकाशवाणी केंद्र परिसरातील ६ पुरुष व ६ महिला आहेत, अलकुंटे चौकात १ पुरुष व १ महिला, बापूजीनगर येथे २ पुरुष व २ महिला, भारतरत्न इंदिरा नगर १ पुरुष व १ महिला, नई जिंदगी परिसरातील १ पुरुष व ३ महिला, रंगभवन परिसरातील १ पुरुष व शनिवार पेठ येथील एका महिलेचा समावेश आहे.
त्याचबरोबर, रेल्वे लाईन परिसरातील १ पुरुष, न्यू पाच्छा पेठ येथील १ पुरुष व १ महिला यांचाही समावेश आहे. आज ज्या महिलेचा मृत्यू झाल आहे ती पावली न्यू. पाच्छा पेठ परिसरातील असून ती ४८ वर्षांची आहे. ६ मे रोजी सिव्हील रुग्णालयात या महिलेस दाखल करण्यात आले होते, मात्र दुपारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, जिल्ह्यातील आत्तापर्यंतची मृतांची संख्या ही ११ इतकी झाली आहे. यात ५ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या १८२ जणांमध्ये १०३ पुरुष, तर ७९ महिलांचा समावेश आहे. यात बरे झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या ही २९ इतकी आहे.
आजपासून सोलापूर महानगरपालिकेचे सर्व कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. कार्यालयात ३३ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील असे नियोजन आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, असे आदेश पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी आज काढले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खरेदी विक्री दस्त नोंदणीचे कामकाज उद्यापासून संबंधित कार्यालयात सुरू होईल. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा-कोरोनामुक्त रूग्णांवर फूलांची उधळण भोवली, एमआयएम नेते फारूक शाब्दी यांच्याविरोधात गुन्हा