सोलापूर- संचारबंदी काळात करमाळा तालुक्यातील फिसरे परिसरात जमाव गोळा करून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली होती. वाढदिवसात सहभाग असलेल्या २४ जाणांपैकी १६ जाणांना करमाळा पोलिसांनी अटक केली असून त्यांना तहसिलदारासमोर उभे करून शपथपत्रावर सोडण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी झाल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसातील अधिकारी विनायक काळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन केले आहे. त्यामुळे, वाढदिवस साजार करणाऱ्यांएवजी पोलीस अधिकाऱ्यालाच हे प्रकरण भोवले आहे.
फिसरे येथील विकास ननवरे यांचा २४ तारखेला रात्री पावणे दहाच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी हातात तलवार व संचारबंदीत जमाव गोळा करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यात सोलापूरहून करमाळा येथे संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी काळे हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी फिसरे येथे आले होते. ते ननवरे यांच्या वाढदिवसामध्ये सहभागी झाले होते. या वेळी तलवारीने केकही कापण्यात आले होते. या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.