सोलापूर - जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदार संघात 154 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 11 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या ठिकाणी 2 बॅलेट मशीन लावाव्या लागणार आहेत. यामध्ये सांगोला, सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर या 3 मतदारसंघाचा समावेश आहे.
शिवसेनेच्या विद्यमान आमदारासह जिल्हा प्रमुखाची बंडखोरी -
सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 3 तगड्या उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदारसंघात अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी देखील सोलापूर शहर मध्य मतदारसंघात अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेचे समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे.
हेही वाचा -मंगळवेढा कारागृहातून आरोपीचे पलायन; गुन्हा दाखल
मागच्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे हे शिवसेनेकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यांनी आता या मतदारसंघातून आमदारकीसाठी अर्ज कायम ठेवला आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला होता. काळुंगे यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे.
दक्षिण सोलापुरात थेट लढत - सहकारमंत्र्यांचा मार्ग सुकर
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे बाबा मिस्त्री उभे आहेत. सध्या तरी देशमुखांना ही लढत अगदी सोपी झाली आहे. या मतदारसंघात एमआयएचे अमितकुमार अजनाळे आणि वंचितचे युवराज राठोड हे उमेदवार असले तरी प्रमुख लढत ही काँग्रेस आणि भाजप यांच्यातच होईल, असे चित्र सध्यातरी आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटते. कारण मागील वर्षी निवडणुकीत सहकारमंत्र्यांच्या विरोधात असलेले दिलीप माने आणि गणेश वानकर हे देशमुखांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करत आहेत.
करमाळ्यात तिरंगी लढत-
करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेने विद्यमान आमदाराचे तिकीट कापून ऐनवेळी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिल्याने आमदार पाटील यांनी बंडखोरी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमाम शिंदे हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपली उमेदवारी माघारी घेत संजयमामांना पाठिंबा दिला आहे. तर संजयमामांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने राष्ट्रवादीला ऐनवेळी संजय पाटील घाटणेकरांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीची उमदेवारी असली तरीही करमाळ्यात फाईट ही रश्मी बागल, संजयमामा आणि नारायण पाटील या तिघांमध्ये असणार आहे.
माढ्यातही थेट लढत, शिवाजी कांबळेंची माघार अन् राजकीय संन्यास
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवाजी कांबळे यांनी दंड थोपटले होते. त्यांना कोणत्यातरी मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती न मिळाल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज काढून घेतला आहे. तसेच त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता बबन शिंदेंना लढाई सोपी झाली असून महायुतीच्या संजय कोकाटेंशी थेट लढत होत आहे.
माळशिरसमध्ये राम सातपुते अन् जानकर यांच्यात थेट लढत -
माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्यामुळे ऐनवेळी भाजपमध्ये गेलेल्या उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने उमदेवारी दिली. तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून मोहिते-पाटील समर्थकाला उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना संघात कार्य केलेल्या राम सातपुते यांना उमदेवारी देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने मोहिते-पाटलांवर सोपवली आहे.
हेही वाचा - तुम्ही मला माझ्या विकास कामांमुळे नाकारणार नाही - नारायण पाटील