सोलापूर - माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील बचत गट आणि मायक्रो फायनान्सच्या कर्ज वसूली तगाद्याला व अधिकाऱ्यांच्या अश्लील भाषेला वैतागून 15 कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. इच्छा मरणासाठी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठवले.
मायक्रो फायनान्सच्या कर्ज वसुली तगाद्याला कंटाळून १५ कुटुंबांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी - वेळापूर इच्छामरण मागणी
लॉकडाऊन अगोदर वेळापूर येथील १५ कुटुबांनी बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. आता या कंपनीने कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. या प्रकाराला कंटाळून 15 कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे.
वेळापूर येथील सिकंदर कोरबू यांची लॉकडाऊन आणि कोरोना महामारीमुळे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. लॉकडाऊन अगोदर त्यांनी आणि इतर काही कुटुंबांनी बचतगट व मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. आता फायनान्स कंपनीचे अधिकारी कर्ज वसूलीसाठी तगादा लावत आहेत. कर्ज आणि हप्ते न भरल्यामुळे अरेरावी आणि अश्लील भाषेचा वापर करत आहेत. सद्य परिस्थिती बघता हप्ते भरणे शक्य नसल्याचे 15 कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. ज्या व्यापारासाठी कर्ज घेतले होते. तो या कोरोना महामारीमुळे पूर्णपणे बंद झाला आहे. कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळलो असून 7 सप्टेंबरपर्यंत 15 कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी इच्छा मरण्याची परवानगी द्यावी, असे निवेदन या कुटुंबांनी दिले आहे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
मुख्यमंत्री, सोलापूरचे जिल्हाधिकारी, माळशिरसचे तहसीलदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमदार राम सातपुते, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना हे निवेदन देऊ केले आहे. आमदार राम सातपुते यांनी कोरबू कुटुंबाची भेट घेतली. तणावात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. मी मुख्यमंत्री महोदयांना तातडीने पत्र देऊन या प्रकरणी आपण मार्ग काढण्याचे आश्वासन सातपुते यांनी दिले.