सोलापूर - सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी (दि.8 मे) एका दिवसात तब्बल 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. आत्तापर्यंत 196 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 14ने वाढ झाली आहे. कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 196 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 13 झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना चाचणीसाठी एकूण 2 हजार 874 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 665 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2 हजार 469 निगेटिव्ह तर 196 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
शुक्रवारी 170 अहवाल आले यात 156 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह आहेत. यात 8 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी जे रूग्ण मिळाले त्यात गवळी वस्ती, आकाशवाणी जवळ 1 पुरुष, शास्त्रीनगर 1 पुरूष, कुमठा नाका हुडको परिसर - 1 पुरूष, समर्थ नगर सिव्हीलमागे 1 महिला, गीतानगर पाच्छापेठ 1 पुरूष, भारतरत्न इंदिरा नगर 1 महिला, संजयनगर कुमठा नाका 1 पुरूष, रविवार पेठ 1 महिला, न्यू पाच्छा पेठ 2 पुरूष, 1 महिला, मोदीखाना 1 महिला, सदर बझार 1 महिला, सिद्धेश्वर पेठ 1 पुरूषाचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 196 जणांत 111 पुरूष तर 85 महिला आहेत. त्यापैकी मृत तेरा जणांमध्ये 6 पुरूष, 7 महिला आहेत.