पंढरपूर -माळशिरस तालुक्यातील खुडूस या गावाच्या हद्दीत पिकअप वाहनातून 9 लाखांच्या गुटख्यासह 13 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. माळशिरस पोलीस ठाण्यात भाऊसाहेब महादेव वायदंडे (रा. गिरझणी) व प्रकाश चोरमले (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
माळशिरस पोलिसांकडून कारवाई
माळशिरस तालुक्यातील खुडूस गावाच्या हद्दीमध्ये पोलीस रात्रीची गस्त घालत असताना अप्सरा हॉटेल समोर एक पिकप वाहन येताना दिसली. पिकअप थांबून पिकअपच्या चालकाला पिकअपमध्ये काय असे विचारले असता. त्याने गाडीत गुटखा व पानमसाला बॉक्स असल्याचे सांगितले.
पिकअप चालकाकडे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल
पोलिसांनी पिकअपचा दरवाजा उघडून पाहिला असता पिकअपमध्ये विमल पानमसाल्याची 20 पोती (4 हजार पाकिटे), व्हीवन टोबॅको 4 मोठी पोती (4 हजार 800 पाकिटे), विमल पानमसाला दोन मोठी पोती (400 पाकिटे), व्ही वन टोबॅको 3 मोठी पोती (600 पाकिटे), विमल पानमसाला एक मोठे पोते (200 पाकिटे), आरएमडी पानमसाला तीन मोठे बॉक्स (120 पाकिटे), एम. सॅन्टेड टोबॅको तीन मोठे बॉक्स असे 9 लाख 11 हजार व टमटम किंमत 4 लाख 50 हजार, असा 13 लाख 61 हजारांचा माल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद भारत भीमराव भोसले सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी दिली.
मंगळवेढा येथे 7 हजार रुपयांचा गुटखा जप्त
कर्नाटक राज्यातून मोटर सायकलवरून मंगळवेढयाकडे येणारा 7 हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने पकडला आहे. याप्रकरणी अर्जुन साबळे (वय 28) आणि सर्जेराव साबळे ( दोघे ही रा. हंगिरगे ता.सांगोला) यांना ताब्यात घेतले असून या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही लगत असलेल्या कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात चोरट्या मार्गाने गुटखा मंगळवेढयातून अन्य भागामध्ये विक्रीसाठी जात असतो. या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे मंगेश लवटे यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी आज गुरुवारी साडे दहाच्या दरम्यान हुन्नूर येथे सापळा रचला होता.
हेही वाचा - परभणीत 'बर्डफ्लू' चा धोका; मुरूंबा गावात 700 पक्ष्यांचा मृत्यू, गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर