सोलापूर :शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे सध्या ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 1200 रुग्ण ऑक्सिजनवर श्वास घेत आहेत. तर सोलापुरातील 190 रुग्णांचा जीव व्हेंटिलेटरवर अडकला आहे.
ऑक्सिजनची मागणी वाढल्याने त्याच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजन किती आहे किंवा त्याचा साठा किती उपलब्ध आहे, हे सांगता येणार नाही. कारण जसा ऑक्सिजन संपतो, तसे सिलिंडर किंवा टँकर येऊन भरून जात असतात. त्यामुळे हे अचूक सांगता येणार नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
ऑक्सिजनच्या किमती वाढल्याने रुग्णांच्या हॉस्पिटल बिलांत वाढ -
यापूर्वी एक ऑक्सिजनचा सिलिंडर साधारणपणे 119 रुपयांना मिळत असे, मात्र आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्सिजन सिलिंडरचा दर 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोलापूरमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज 40 ते 50 हजार ऑक्सिजन सिलिंडरची मागणी होत आहे. ऑक्सिजनच्या किमतीत वाढ झाली. मात्र ही वाढ रुग्णांच्या बिलातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे.
सोलापुरातील ऑक्सिजन विक्रते-
सोलापूरच्या टेम्भुर्णी येथील एस. एस. बॅग्स आणि होटगी रोड येथील आर. टी. एस. या दोन कंपन्यात ऑक्सिजन तयार केला जातो. मात्र उत्पन्नापेक्षा मागणी प्रचंड वाढल्याने या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांवर ताण आला आहे. 24 तास ऑक्सिजनचे उत्पादन करून देखील या कंपन्या मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे चित्र आहे. तसेच अरनिकेम आणि एल आर इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांत लिक्विड ऑक्सिजनचे गॅसमध्ये रूपांतर केले जाते. या सर्व ठिकाणी ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. सोलापूर शहराला दररोज 5 ते 7 हजार ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे.