सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील आळगी, अंकलगी, गुड्डेवाडी, कुडल या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. भिमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही आणि तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लोकांवर नेहमीच अन्याय केला जातो. याचा निषेध म्हणून या गावांतील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला.
अक्कलकोट तालुक्यातील 'या' चार गावांचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार - बहिष्कार
अक्कलकोट तालुक्यातील आळगी, अंकलगी, गुड्डेवाडी, कुडल या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना उजनी धरणातील पाणी सोडावे, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाकडून उजनी धरणातील पाणी या गावांना सोडण्यात आले नाही. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील ४ गावांनी मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला आहे. या ठिकाणी दुपारी ३ वाजेपर्यंत गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नव्हते.
उजनी धरणातून काही ठिकाणी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना हे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे भीमा नदीकाठच्या २० गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यापैकी १६ गावांनी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला आहे. पण या ४ गावांनी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे.