पंढरपूर - जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. रुग्णांना तत्काळ प्राथमिक उपचार मिळावे, या हेतूने जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे व गावात संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ग्रामपंचायतींना कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात अशी असतील केंद्रे
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींकडून कोविड सेंटरची उभारणी करण्यात येईल. पहिल्या टप्यात शंभर गावात या सेंटरची उभारणी होणार आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वात जास्त संक्रमण असलेल्या पंढरपूर तालुक्यात 2, तर त्या खालोखाल माळशिरस तालुक्यासाठी 19 नवीन सेंटरची निर्मिती करता येणार आहे. अक्कलकोट तालुक्यात सहा, बार्शीत पाच, करमाळ्यात पाच, कुर्डुवाडीत नऊ, मोहोळला आठ, मंगळवेढ्यात तीन, सांगोल्यात दहा, दक्षिण सोलापुरात नऊ, उत्तर सोलापुरातील पाच, या प्रमाणे शंभर सेंटर उभी राहतील.
स्थानिक स्तरावरील खासगी व शासकीय वैद्यकीय सेवा-
संबंधित गावातील सुयोग्य असे सार्वजनिक ठिकाण निश्चित करून २५ ते ५० क्षमतेच्या खाटांचे कोविड सेंटर दोन दिवसांत सुरू करण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागाध्येही कोविड बाधितांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपाययोजना करत सेंटरची उभारणी होणार आहे. या सेंटरमध्ये स्थानिक स्तरावरील खासगी तसेच शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. कोविड केंद्रांमध्ये औषधांची व्यवस्था तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.