सिंधुदुर्ग- जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तसेच लॉकडाऊनचे बरेचसे नियम शिथिल केले आहेत. यामुळे काही प्रवासी आपल्या जिल्ह्यात येऊ शकतात आणि यातून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्हावासीयांनी शासन व आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभागाबरोबरच थेट लोकसमुहाशी जोडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचाही मोठा वाटा असल्याचे सांगून या स्वताचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे डॉ. चाकूरकर यांनी विशेष आभार मानले आहेत.
रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत कोरोनाचे तीन मोठे हॉटस्पॉट आहेत. या सर्व ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यावहारिक नाते जोडलेले आहे. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ एक रुग्ण सापडला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतर्क झाले. तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. संबधित रुग्णाचे गावही आयसोलेट करण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा तातडीने बंद करण्यात आल्या. जिल्ह्यात भरणारे आठवडा बाजार बंद करण्यात आले. याला जिल्हावासियानीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सगळ्यातून आज एक चांगली बातमी आली टी म्हणजे सिंधुदुर्ग कोरोनामुक्त झाला.