महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अर्थनिर्भर' होण्यासाठी सिंधुदुर्गातील महिलांचा नवा प्रयोग, मखर व्यवसायातून उत्पन्नाचा मार्ग - ganeshotsav 2020 sindhudurg news

गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील मालवण तालुक्यातला नांदोस येथील महिलांनी एकत्रित येत इकोफ्रेंडली मखर डेकोरेशनचा व्यवसाय चालू केला आहे. या माध्यमातून महिलांनी 'अर्थनिर्भर' होण्यासाठीचे एक पाऊल पुढे उचलल्याचे चित्र असून जिल्ह्यातील अनेकांना त्यांचा हा उपक्रम मार्गदर्शक ठरत आहे.

अर्थनिर्भर होण्यासाठी सिंधुदुर्ग मधील महिलांचा नवा प्रयोग
अर्थनिर्भर होण्यासाठी सिंधुदुर्ग मधील महिलांचा नवा प्रयोग

By

Published : Aug 19, 2020, 6:38 PM IST

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण तालुक्यातला नांदोस गावचा डोंगर हा कधी काळी पैशाच्या पावसाच्या प्रकरणामुळे बदनाम झाला होता. पैशाचा पाऊस पडेल आणि आर्थिक समृद्धी येईल या आशेपोटी अंधश्रद्धेतून शहरातील अनेक माणसे वेड्यासारखी इथे धावली. त्याच गावातील महिला मात्र 'अर्थनिर्भर' होण्यासाठी मेहनत आणि एकजुटीचा मार्ग स्वीकारत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालताना दिसत आहेत.

'अर्थनिर्भर' होण्यासाठी सिंधुदुर्गातील महिलांचा मखर व्यवसायातून उत्पन्नाचा नवा मार्ग

नांदोस गावातल्या महिलांनी एकत्र येत गणपतीसाठी मखर बनवण्याचा हौशी प्रयोग एक उद्योग म्हणून स्वीकारला. त्यांची धडपड ही अनेकांना प्रेरणा देणारी आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात डेकोरेशनसाठी साहित्य उपलब्ध होण्याचा वनवा असतानाही कुठून कुठून धावपळ करुन साहित्याची जमवाजमव ही महिला मंडळी करत आहेत आणि अतिशय सुंदर मखर या मेहनती हातांतून साकारत आहेत. या उपक्रमाची माहिती देताना वैदेही विठोबा माळकर आणि चारूलता कमलेश चव्हाण म्हणाल्या, 'गणपती उत्सवाचे औचित्य साधून आम्ही एक छोटासा इकोफ्रेंडली मखर डेकोरेशनचा व्यवसाय चालू केला आहे. व्यवसाय करणे प्रत्येकाचे स्वप्न असते, आज आमचेही आहे. पूर्वी तेवढी कधी गरज भासली नव्हती आणि तसे पाहता कोणी काहीही म्हणोत, घरात गृहीणींना कामे कधीच कमी पडत नाहीत. आम्हीही त्यात गुंतून पडत होतो. शिवाय आमच्या यजमानांकडे असलेल्या नोकरी व्यवसायांमध्ये आजपर्यंत आमच्या कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालत असे. पण जगावर कोरोना महामारीचे संकट कोसळल्यानंतर सुमारे चार महिने जे लॉकडाऊन सुरू आहे, त्यात भविष्यातल्या भीषण परिस्थितीची कल्पना आली.

आमच्याकडे पिवळे रेशनिंग कार्ड नसल्याने कोणतीही सरकारी मदत मिळण्याची आशा-अपेक्षा आम्हाला नाही. त्यात गृहखर्च चालवण्याची आमच्या यजमानांची ओढाताण पहाता संसाराचे दुसरे चाक म्हणून आता आमची जबाबदारी पार पाडायची वेळ आलेली आहे. म्हणून छोट्या मोठ्या व्यवसायातून या आर्थिक संकटाशी दोन हात करायचे आम्ही ठरवले. अनेकांना कुठेकुठे केलेल्या कामाचे पगारही मालकवर्गाने देण्यास असमर्थता दाखवली. अखेर आम्ही एकत्र येत ही नव्याने सुरुवात केली आहे. एका अर्थाने, गणपतीच्या निमित्ताने आमच्या व्यवसाय संकल्पाचाच हा श्रीगणेशा आहे. यापुढे याच भांडवलातून आम्ही अन्य व्यवसायही एकत्रितपणे सुरू करणार आहोत. असे त्या म्हणाल्या. खरतर या महिलांना कोकण हेल्पलाईन या संस्थेने व्यवसायासाठी प्रेरित केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या महिलांचा मखर व्यवसाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details