सिंधुदुर्ग - पोलिसांवर मारहाणीच्या प्रकरणात कणकवलीच्या नगराध्यक्षासह चार जणांवर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना अटक केव्हा होणार?, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. पोलिसांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दिवस रात्र मेहनत घेत आहेत. या काळात कणकवली शहराचे नगराध्यक्ष व अन्य चार आरोपींनी पोलिसांना जी वागणूक दिली ती निंदनीय आहे. गुन्हा दाखल होऊनही अद्याप या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मनसैनिकांसोबत अनेकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल शंका निर्माण झाली आहे, असे परशुराम उपरकर म्हणाले.