सिंधुदुर्ग -जिल्ह्यात लॉकडाऊन काळात सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता पाणी टंचाईच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आली असून जिल्ह्यातील 47 गावांमधील टंचाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागाला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्ह्यातील शहरी भागात आणि धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या वाडय़ा- वस्त्यांमध्ये उन्हाळय़ात पाण्याची टंचाई जाणवते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विहीर खोदणे, विंधन विहीर, विहीर दुरुस्ती, गाळ काढणे, विहीर खोल करणे, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती अशाप्रकारची कामे हाती घेण्यात येतात. लॉकडाऊनच्या काळात ही कामे करणे शक्य होत नव्हते. आता मात्र, उन्हाळ्य़ात जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा विचार करता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाईच्या कामांना सुरुवात करण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील 47 गावांमधील कामांना सुरुवात झाली आहे. या कामांमध्ये 33 विंधन विहीर दुरुस्ती, 13 नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती आणि एक पूरक नळपाणी योजनेचा समावेश आहे. यातील नऊ गावांमधील विंधन विहीर दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. तर 56 गावांमधील 42 विंधन विहीर दुरुस्ती, 13 नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती आणि एक पूरक नळ पाणी योजना उभारणीच्या कामांना सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 120 कामे निविदा प्रक्रियेत असून त्यामध्ये 35 विंधन विहीर दुरुस्ती, 81 नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती, चार पूरक नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.