सिंधुदुर्ग- संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री असोत अथवा शरद पवार यांच्याकडून जबाबदारीने कारवाई होणे, हे सामान्य माणसाला अपेक्षीत आहे. असे सांगतानाच 'सामना'च्या संपादकीयमध्ये आता कथा लिहायला सुरुवात झाली आहे. अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशील असायला हवे. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात. असं असताना मुख्यमंत्री असतील शरद पवार असतील यांच्याकडून जबाबदारीने कारवाई होणे, हे सामान्य माणसाला अपेक्षीत आहे. अधिवेशनाच्या आधी संजय राठोड यांचा राजीनामा ते घेतेली असे मला वाटत असल्याचे यावेळी विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
'सामना'च्या संपादकीयमध्ये आता कथा लिहिल्या जातात ...तर राज्यातही पेट्रोल स्वस्त मिळेल
पेट्रोल, डिझेल दर वाढीवरून सामनामधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती. दरम्यान या टीकेला देखील तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सामनाच्या संपादकीयमध्ये आता कथा लिहायला सुरुवात झाली आहे. कथेने काही होणार नाही. जगामध्ये सर्वत्र इंधनाची दरवाढ होते आहे. हे लोकांना माहिती आहे. कर्नाटक ,गुजरात व गोव्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहे. त्यामुळे तीथे पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते. नेपाळ, श्रीलंका सोडा तुमच्या शेजारच्या राज्यात पेट्रोल स्वस्त का आहे याचा विचार करा. राज्य सरकारने जर कर कमी केला तर पेट्रोल इथेही स्वस्त मिळेल असे ते यावेळी म्हणाले.
...म्हणून सरकार अधिवेशन लवकर गुंडाळत आहे
कोरोना मुद्द्यावरून अधिवेशन गुंडाळण्याबाबत बोलताना तावडे म्हणाले की, सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. विधिमंडळ हे अतिशय सुरक्षीत असते, तीथे सर्वांची कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येतो, माग हे सरकार अधिवेशन गुंडाळण्याची का घाई करत आहे. कारण या सरकारला विरोधकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची भीती वाटत असल्याने अधिवेशन गुंडाळण्याचा घाट घातला जात असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.