महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस

आजच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० या प्रमाणे ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात पहिल्या लाभार्थी अलका सांगवेकर यांना तर कणकवली उपजिल्हा रुग्नालयात पहिले लाभार्थी मनोहर परब याना लस देण्यात आली.

Sindhudurg
Sindhudurg

By

Published : Jan 16, 2021, 3:08 PM IST

Updated : Jan 16, 2021, 3:29 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोव्हिड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरीसह उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व सावंतवाडी येथे या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० या प्रमाणे ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात पहिल्या लाभार्थी अलका सांगवेकर यांना तर कणकवली उपजिल्हा रुग्नालयात पहिले लाभार्थी मनोहर परब याना लस देण्यात आली.

सुरुवातीस लाभार्थ्यांचे समुपदेशन

लसीकरणावेळी सुरुवातीस लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात आली. त्यासाठी लाभार्थीचे छायाचित्र असलेले कोणतेही एक ओळखपत्र घेण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षामध्ये बसविण्यात आले. प्रतीक्षा कक्षानंतर त्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी नंतर लाभार्थींना लस देण्यात आली. लस देतेवेळी लसीकरण करणाऱ्या डॉक्टर्स व नर्सनी त्यांचे लसीविषयी समुपदेशन केले. त्यानंतर त्यांना अर्ध्या तासासाठी निरीक्षण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पहिल्या लाभार्थीचे लसीकरण करण्यात आले.

दोन डोस घेणे गरजेचे

जिल्ह्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट निर्मित कोव्हिशिल्ड लसीचे १० हजार २६० डोसेस उपलब्ध झाले आहेत. तसेच लसीच्या एक हजार २६ व्हायल्स तसेच इंजेक्शनसाठी १२ हजार ६०० सिरींज मिळाल्या आहेत. ही लस २ ते ८ सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल ५ मि .ली.ची असून प्रत्येक व्यक्तीस ०.५ मि. ली. एवढा डोस देण्यात येत आहे. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. दोन डोसच्यामध्ये ४ ते ६ आठवड्यांचे अंतर असणार आहे.

लसीचे सर्वसाधारण दुष्परिणाम 'हे' आहेत

ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची ॲलर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आहेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गर्भवती माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तर डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परिणाम आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण १६ सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ४ हजार ५०० लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी ४ व्हॅक्सिनेशन ऑफिसर, २ व्हॅक्सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.

'देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक'

हा दिवस भारत देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतनिर्मित कोव्हिड-१९ लसीकरण आज देशभरात सुरू झाले आहे. आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न देशात बनविलेल्या कोव्हिड-१९ लसीमुळे पूर्ण होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हिड-१९ लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनाशी संपर्कात आहोत. जिल्हावासीयांनी यासाठी साथ द्यावी, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथे बोलताना केले केले. आमदार राणे यांच्या हस्ते कणकवलीत लसीकरणाचा शुभारंभ झाला.

'लस घेणाऱ्यांची घेतली जातेय पुरेपूर खबरदारी'

उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूण १०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार आहे. लसीकरणानंतर या लोकांना अर्धा तास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. अशी माहिती लसीकरण कक्षाच्या प्रमुख वरिष्ठ परिचारिका नयना मुसळे यांनी दिली.

Last Updated : Jan 16, 2021, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details