सिंधुदुर्ग - गोवा राज्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण 15 मे पासून सुरू होणार आहे. राज्यातील 35 आरोग्य केद्रांमध्ये हे लसीकरण सुरू होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोविन’ या पोर्टलवर नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटाोतील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. सध्या राज्यामध्ये सुरू असलेले 45 वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरणही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कोविड फ्रंटलाइन वर्करमध्ये समावेश
गोवा राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचारी यांना कोविड फ्रंटलाइन वर्करमध्ये समावेश करण्यात आले आहेत. शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत यांनी आज याबाबतचे परिपत्रक काढले आहे. शाळांतील शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यात आला असून त्यांना लसीकरण व इतर सोयींचा लाभ प्राधान्याने मिळणार आहे.