सिंधुदुर्ग -जिल्ह्यात अवकाळी पावसाने आज दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसामुळे हापूस आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा - पावसामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान
सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले -
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. काही दिवसांपासून अधून मधून वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांना पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांसह हा पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील करूळ, सडुरे, नावळेसह भुईबावडा आणि करूळ घाट परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. कणकवली तालुक्यातील फोंडा, घोणसरी, नांदगाव परिसरात चांगला पाऊस पडला.
आंबा पीक धोक्यात -
सतत पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील आंबा एप्रिल अखेरीस परिपक्व होण्यास सुरूवात होते. सध्या या भागातील आंबा परिपक्व होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे या भागातील आंबा पीक धोक्यात आले आहे. सततच्या पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वैभववाडी तालुक्यात पावसामुळे नुकसान -
सिंधुदुर्गावर अवकाळी पावसाचे सावट आज दुसऱ्या दिवशीही कायम होते. वेंगुर्ले तालुक्यातील काही भागासह शिरोडा परिसरात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात आज शुक्रवारी शिरोडा गावासह काही गावांमध्ये सकाळी १०:३०च्या सुमारास ढगांचा गडगडाट करत अवकाळी पाऊस सुरु झाला. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आंबा, काजूच्या ऐन हंगामात पाऊस आल्याने बागायतदारांवर अस्मानी संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. वैभववाडी तालुक्यात या पावसाने गुरूवारी जोरदार तडाखा दिला. मोठ्या प्रमाणावर वैभववाडी तालुक्यात सडूरे गावातील ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अक्षरश: त्यांच्या घरांचे छप्पर उडून गेली आहेत. पावसामुळे ग्रामस्थांचे १ लाख ३५ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अरुळे गावचे सरपंच उज्वल नारकं यांनी दिली आहे. अवकाळी पावसामुळे विजेचा खेळखंडोबा चालू आहे.
लॉकडाऊनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक -
जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, सायंकाळी तीन वाजल्यापासुन जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली, वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. लॉकडाऊनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक लागला. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर उष्म्याने कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन मान्सूनसाठी सज्ज आहे का?
एक जूनला केरळात मान्सून दाखल होईल त्यानंतर तळकोकणात सुद्धा लवकरच पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन मान्सूनसाठी सज्ज आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होते, अशावेळी उपाय योजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच कमी पडत असल्याचा निदर्शनात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेत प्रतिबंध उपायोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. दरवेळी मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यादृष्टीने सुद्धा पावसाळ्या आधी लाईन वरील कोलमडून पडणार नाहीत ना याचे नियोजन करून वेळीच लाईन वरील झाडे तोडण्यात यावीत, अशी देखील मागणी होत आहेत.