सिंधुदुर्ग -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा करत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. हिंदुत्ववादी विचाराच्या बाळासाहेबांचा पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे. मलिक यांच्या समर्थनासाठी उपोषण करणाऱ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहीजे, असे नारायण राणे म्हणाले.
नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी केली अटक -
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सात तास चौकशी केल्यानंतर ईडीने बुधवारी अटक केली. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.