सिंधुदुर्ग - राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती अचानक थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सिंधुदुर्गात आता गावागावात महिलांच्या प्रभात फेऱ्या निघत आहे. शासनाला मदत म्हणून महिला एक-एक रुपयाही गोळा करत आहेत.
जिल्ह्यात 2013पासून उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूह सक्षमीकरणाची (बचत गट) प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वयंसहाय्यता समूहाचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतून लाखो कुटुंब उमेद अभियानाला जोडली गेलेली आहेत. यामुळे गरीब कुटुंबांना रोजगार आणि उत्पन्नवाढीच्या संधी प्राप्त होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, हे ज्या कर्मचाऱ्यांनी घडवून आणले त्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती अचानक थांबविण्याचे आदेश देण्यात आले.
यामुळे सध्यस्थितीत चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हे अभियान राबवून महिलांना स्वयंरोजगाराचा आत्मविश्वास दिला त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आता या महिला उभ्या राहिल्या आहेत. मात्र, या अभियानातील ज्या कर्मचाऱ्यांचे शासनासोबतचे करार संपत आहेत त्यांना सेवावाढ देऊ नये, असे राज्य शासनाने आदेश दिले आहेत. याबाबत सिंधुदुर्गात महिला आक्रमक झाल्या आहेत.
यापार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील नाटळ हिरकणी प्रभागसंघातील विश्व ग्रामसंघ कुंभवडेच्या महिलांनी गावात प्रभात फेरी काढली आणि स्वच्छता केली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता अनंत सावंत, सचिव प्राजक्ता प्रदीप सुतार, कोषाध्यक्ष सुलोचना सखाराम सावंत, सीआरपी सारिखा संतोष सावंत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सावली ग्रामसंघ नाटळच्या महिलांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभागसंघ/ ग्रामसंघ अध्यक्ष रविना रवींद्र सुतार, सचिव शांती पॉली फर्नांडिस, सीआरपी योगिता एकनाथ चव्हाण, सीआरपी तन्वी तुळाजी राणे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.
तर जिद्द ग्रामसंघ नरडवेच्या महिलांनीही उत्स्फुर्तपणे गावात प्रभातफेरी काढली. यामध्ये सीआरपी पूजा गोविंद सावंत, कृषी सखी गीतांजली गुरुनाथ कांदे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. आधार ग्रामसंघ दारीस्ते संघाने आपल्या गावात प्रभातफेरी काढली सीआरपी जान्हवी पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्ष नमिता नामदेव सुतार, सचिव श्वेता बाबू शिरसाठ, कोषाध्यक्ष रश्मी राजेश साळसकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.