महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इकडं मान वाकव, तिकडं मान वाकव... स्वाभीमान कसला ही तर लाचारी - उद्धव ठाकरे - सतीश सावंत

कणकवलीमधून शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माझा कुठल्या व्यक्तीविरुद्ध लढा नसून कोकण विरुद्ध खुनशी वृत्ती असा हा लढा आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी राणेंवर टीका केली.

संपादित छायाचित्र

By

Published : Oct 16, 2019, 8:55 PM IST

सिंधुदुर्ग - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत राणे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. कालच नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन करण्यात आला. यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, इकडं वाकव मान, तिकडं वाकव मान आणि म्हणे मी स्वाभिमान. हे स्वाभिमानाचे लक्षण नाही. ही तर लाचारी आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

कणकवलीमधून शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, राणेंना शिवसेनेतून हाकलल्यानंतर हे दार ठोकत फिरत होते. त्यावेळेस काँग्रेस जोमात होते. मग यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. तेव्हा मी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या होत्या. आज भाजपला शुभेच्या देतो. हे अनुभवाचे बोल आहेत. हे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसची वाट लावली. स्वत: चा पक्ष काढला त्याची वाट लावली. आता भाजपमध्ये गेले त्यांनाही शुभेच्छा. देवेंद्रजी यांना तुम्ही सांगायला हवे होते की ५ वर्ष थांब मग बघू. मग हे थांबतात का बघा. हे कोणाला देव मानत नाहीत. ही भूत बाहेर काढू टाका नाही तर तुमच्या मानगुटीवर बसतील. वेळेत सावध व्हा, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

मी आज भाजपवर टीका करायला आलो नाही तर, भाजपच्या चांगल्यासाठी आलो आहे. मी खुनशी वृत्तीच्या विरोधात आहे, ती सहन करू शकत नाही. हे आमच्याकडे नकोच पण आमच्या मित्राकडे पण नकोत. ही पाठीत वार करणारी औलाद आहे. आपल्याकडे संघाचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना का उमेदवारी दिली नाही, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. यांच्यात तसा दम नाही. हे घाबरवणार नुसते. पण आरे ला कारे केल्यानंतर एक कानाखाली लावल्यानंतर हे पुन्हा उभे राहणार नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

हा लढा भाजप-सेनेचा नसून सामान्य कोकणवासी आणि खुणशी वृत्ती विरूद्ध हा लढा आहे. युतीचे सरकार आल्यावर सातबारा कोरा करणारच. मात्र, विरोधक म्हणतात याला सातबारा कळतो का? त्यांचं खर आहे. कारण मी कधी दुसऱ्याच्या जमिनी हडप करण्याचे धंदे केले नाही. त्यामुळे मला सात बारा कळत नाही. 10 रुपयात जेवण देण्याच्या घोषणेनंतर मातोश्रीतून जेवण देणार काय? अशी टीका राणेंनी केली होती. यावर बोलताना ठाकरे यांनी तू मातोश्री जेवलास, त्या मिठाला जागलास नाही. तु आम्हाला काय शिकवतो. स्वत: मिठाला जागायचे नाही, मात्र दुसऱ्याच्या जेवणात खडे टाकायचे. आता युतीत खडे टाकतायत, मात्र हे खडे वेळेवर बाहेर काढू, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

हा माझा कोकण असून, तुमच्या मुळावर येणाऱ्यांना हद्दपार करणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विकास पाहिजे पण विनाश करून विकास नको, असे म्हणत त्यांनी कोकणातल्या नाणारला विरोध कायम असल्याचे सांगितले. कोकणी जनतेमुळे शिवसेनेची मुंबईत ताकद आहे. सर्व कोकण किनारा भगवा करायचा आहे. कोकणी जनता भोळी पण मर्द हे नाकर्त्यांनी लक्षात ठेवा, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details