सिंधुदुर्ग(कुडाळ) - गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित गिरणी कामगारांच्या मेळव्यामध्ये ते बोलत होते. गिरणी कामगारांच्या 5 हजार 90 घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी कामगारांच्या यादीत 1 लाख 74 हजार 218 नावांची नोंदणी करण्यात आली आहे.
कुडाळ येथील कामगार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदय सामंत या कामगार मेळाव्याला शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच बरोबर नागेंद्र परब, अतुल बंगे, संजय पडते, मंगेश लोके, म्हाडाचे कार्यकारी अभियंता सुभाष माळी, गिरणी कामगार उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कासणे, वरिष्ठ पडताळणी अधिकारी रविंद्र कोकडे, संजय पेडणेकर आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने गिरणी कामगार उपस्थित होते.
ऑगस्ट मधील लॉटरीमध्ये बॉम्बेडायिंग मिल, बॉम्बेडायिंग स्प्रींग मिल व एमएमआरडीए यांच्याकडून प्राप्त यादीतील गिरणी कामगारांचा समावेश असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच म्हाडा मार्फत यादीतील नोंदणी झालेल्या सर्व कामगारांना घरे मिळावीत यासाठी सुयोग्य नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत मुंबईत कांजूरमार्ग मिठागरे तसेच उपनगरातील शासनाच्या मालकीच्या जागांचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिरणी कामगारांचे संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या शंकाचे निरसण व्हावे, यासाठी म्हाडाचा अधिकारी प्रत्येक महिन्यात एक दिवस जिल्ह्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ते पुढे बोलताना म्हणाले, सिंधुदुर्गात म्हाडामार्फत 1 हजार घरे बांधता येतील यासाठी जिल्ह्यात जागा उपलब्धतेबाबत सहकार्य अपेक्षित आहे. तसेच गिरणी कामगारांनी घरांच्या लॉटरीपध्दतीमध्ये कोणत्याही दलालाचा आधार घेऊ नये, असे आवाहनही सामंत यांनी गिरणी कामगारांना केले. दरम्यान म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी पॉवर-पाईंटच्या प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून म्हाडाची लॉटरी पध्दत, नावाची नोंदणी पाहणे आदीबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. गिरणी कामगारांनी https://millworker.mhada.gov.in या संकेतस्थळावर माहिती पहावी. असे आवाहन त्यांनी केले.