महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाइन अभ्यास अन् नोकरीसाठी त्यांनी बांधली जंगलात झोपडी! - सिंधुदुर्ग ऑनलाइन काम न्यूज

दुर्गम भागातील अनेक मुले-मुली आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, अनेकदा सोयी-सुविधांच्या अभावी त्यांना आपली स्वप्ने अर्ध्यात सोडावी लागतात. मात्र, तांबुळी-टेंबवाडी येथील हेमा व संस्कृती नावाच्या दोन मुलींनी ऑनलाइन अभ्यासासाठी व शिक्षणासाठी चक्क जंगलातच तळ ठोकला आहे.

Online Study and work
ऑनलाइन अभ्यास व काम

By

Published : Sep 16, 2020, 1:58 PM IST

सिंधुदुर्ग - निसर्ग पर्यटन सर्वानाच आवडते. अगदी निसर्गसंपन्न कोकणातील रहिवासी देखील सुट्टीच्या दिवशी रानावनात फिरतात. सध्या मात्र, कोकणात अनेकांना ऑनलाइन शिक्षणासाठी व आपली नोकरी टिकवण्यासाठी जंगलात जावे लागते आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन तरुणींनी मोबाईलला नेटवर्क मिळावे, यासाठी जंगलात उंचावर एक झोपडी बांधली आहे. एकीने आपल्या अभ्यासासाठी तर, दुसरीने आपली नोकरी टिकवण्यासाठी ही धडपड केली आहे. मात्र, मोबाइल व इंटरनेट नेटवर्कसाठी भर पावसातही त्यांना जंगलातच थांबावे लागत आहे.

कोरोनामुळे 'ऑनलाइन' हा शब्द मानवी जीवनशैलीत आता परवलीचा झाला आहे. मात्र, अनेक खेडे गावांमध्ये नेटवर्कच नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. यावर सावंतवाडी तालुक्यातील तांबुळी या दुर्गम गावातील दोन मुलींनी पर्याय शोधला. हेमा सावंत व संस्कृती सावंत अशी या मुलींची नावे आहेत. तांबुळी-टेंबवाडीच्या सीमेवर उंच ठिकाणी त्यांनी एक झोपडी बांधली. गेल्या दोन महिन्यांपासून त्या याच ठिकाणी ऑनलाइन अभ्यास व 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. शिक्षण व नोकरी वाचवण्यासाठी त्यांची रोजची धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे.

तांबुळी-टेंबवाडी येथील हेमा व संस्कृती या मुंबईत राहतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्राने मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. हेमा मुंबईतील तुर्भे येथे एका खासगी कंपनीत अधिकारी आहे. मार्चमध्ये ती आई-वडील, भाऊ यांच्यासह गावी आली. सकाळी 10 ते 1 आणि दुपारी अडीच ते साडेपाच या कालावधीत तिला ऑनलाइन काम करावे लागते. तर, संस्कृती दहावीत आहे. तिलाही ऑनलाइन शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या दोघींच्या कुटुंबीयांनी तांबुळी गावी येण्याचा निर्णय घेतला. बांदा शहरापासून 12 किलोमीटरवर असलेले हे गाव दुर्गम असून नेटवर्क कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे येथे आलेल्या हेमा व संस्कृतीच्या प्रत्येक कामावर मर्यादा आल्या. त्यावर त्यांनी पर्याय शोधत जंगलाच आपला मुक्काम ठोकला आहे.

केंद्राच्या भारत नेट प्रकल्पाअंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 पैकी 361 ग्रामपंचायती या फेज वनमध्ये समाविष्ट असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून सर्वांना इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. मात्र, ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत आवश्‍यक आहे.

काही दिवसांपूर्वीच कणकवलीच्या दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या तरुणीची जंगलात झोपडी बांधून अभ्यासाची धडपड समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तिला तिच्या दुर्गम गावातील घरी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details