सिंधुदुर्ग - सध्या जिल्ह्यात दोन ठिकाणी कंटेनमेंट झोन असून त्याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू आहे. यामध्ये नेरुर-कुडाळ आणि वाडा देवगड या ठिकाणांचा समावेश आहे. नव्याने आढळलेल्या 3 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 51 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी 27 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झालेले असून ते निगेटिव्ह आहेत. उर्वरीत 24 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. या सर्व व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन कंटेनमेंट झोन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - सिंधुदुर्ग कोरोना अपडेट
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेरुर-कुडाळ आणि वाडा देवगड ही दोन ठिकाण कंटेनमेंट झोन आहेत. तेथे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 1 हजार 260 व्यक्ती विलगीकरणात आहेत. त्या पैकी 746 व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून 514 व्यक्ती या संस्थात्मक विलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 114 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी 976 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत 968 अहवाल निगेटिव्ह आहेत. अद्याप 138 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 101 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 55 रुग्ण कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये, 33 रुग्ण कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, 13 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत 6 हजार 289 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या 8 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 4 रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून 4 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार अखेर एकूण 24 हजार 555 व्यक्ती दाखल झाल्या आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.