सिंधुदुर्ग - कोकण किनाऱ्यावर मासेमारीच्या तुटलेल्या जाळ्यात अनेक जलचर अडकलेल्या स्थितीत सापडत आहेत. असाच एक ऑलिव्ह रिडले जातीचे कासव जाळ्यात अडकलेल्या स्थितीत वेंगुर्ला वायंगणी किनाऱ्यावर आढळून आले. तेव्हा त्याला कासव मित्र सुहास तोरसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळ्यातून सुखरूप काढले आणि त्या कासवाला वायंगणी समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
खोल समुद्रात मासेमारी करताना, बऱ्याचवेळा मच्छीमारांची मासेमारीची जाळी समुद्रात तुटून जातात. सध्या पावसाळी वातावरणामुळे समुद्राला उधाण आले आहे. यामुळे समुद्रातील घाण लाटांसोबत या जाळ्याही किनाऱ्यावर येत आहे. या जाळ्यात अनेक जलचर अडकलेले असतात. अशाच एका जाळ्यात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव अडकले होते.