सिंधुदुर्ग - सप्टेंबर महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. याबाबत आपले मत काय असा, प्रश्न आज कणकवली दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारला असता ते म्हणाले, नारायण राणे यांच्या ज्योतीष व्यवसायाला माझ्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडीतील कोणीही आमदार नाराज नाहीत उलट त्या आमदारांची नाव तुम्हाला माहित असतील तर द्या त्यांना निधी देऊ, असेही परब म्हणाले.
आज (24 ऑगस्ट) कणकवली एसटी आगाराच्या जागेची परिवहन मंत्री अनिल परब यांनी पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अरुण दुधवडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, नारायण राणे यांनी ज्योतिषाचा व्यवसाय कधी सुरु केला हे मला माहित नाही. मात्र, सध्या त्यांना काही काम नसल्याने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असावा, त्यांच्या या नव्या व्यवसायाला माझ्या शुभेच्छा, असा टोला त्यांनी राणे याना लगावला. महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदार निधी मिळत नसल्याने नाराज आहेत याबाबत आपले मत काय, असे विचारले असता मंत्री अनिल परब म्हणाले, आम्हाला आमच्या सरकारमधील नाराज आमदार कोण हे माहित नाही. पण, जर तुम्हाला माहित असतील तर त्या आमदारांच्या नावांची यादी द्या त्यांना निधी देण्याची व्यवस्था करू. मात्र, असे कोणीही आमदार नाराज नाहीत, असा दावा त्यांनी यावेळी केला.