सिंधुदुर्ग - सार्वजनिक बांधकाम विभाग वाहन चालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबोली घाटरस्ता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खचला आहे. वाहतुकीला धोका होऊ नये यासाठी संरक्षकठडा उभारणे गरजेचे होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरते बांबूचे बॅरिकेटिंग लावून वाहतूक सुरू केली आहे. सध्या तेही कोसळल्याने खचलेला मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
आंबोली घाटात संरक्षण कठड्याविनाच खचलेल्या रस्त्यावरुन वाहतूक सुरु - आंबोली घाटरस्ता
कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका आंबोली घाटमार्गाला बसला होता. आंबोली मुख्य धबधब्या समोरील रस्त्याचा निम्मा भाग खचला आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणाहून फक्त हलक्या वाहनांना एकेरी वाहतुकीसाठी परवानगी आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग वाहन चालकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका आंबोली घाटमार्गाला बसला होता. आंबोली मुख्य धबधब्या समोरील रस्त्याचा निम्मा भाग खचला आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणाहून फक्त हलक्या वाहनांना एकेरी वाहतुकीसाठी परवानगी आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग वाहन चालकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. खचलेल्या ठिकाणचा रस्ता आणखी खचण्याचा धोका आहे. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची माती वाहून जाऊ नये. तसेच उर्वरित रस्त्याला धोका पोहचू नये यासाठी संरक्षक भिंत उभारणे गरजेचे होते. मात्र, सार्वजनिक विभागाकडून बांबूचे तात्पुरते बॅरिकेटिंग करण्यात आले. मात्र, ते ही कोसळून पडल्याने रस्ता आणखी खचत आहे. खचलेल्या रस्त्याखालील भरावाची माती देखील सातत्याने ढासळत आहे. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या बाजूला थेट खोल दरी असल्याने हा मार्ग अजून खचल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. असे असताना येथून सध्या बंद असलेली अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे येथे संरक्षक कठडा बांधून नंतरच वाहतूक सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.