महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तौक्ते’ चक्रीवादळ गोवा-सिंधुदुर्गच्या दिशेने; गोव्यात एनडीआरएफ दाखल; मुंबईत वाऱ्यासह पाऊस - एनडीआरएफ

‘तौत्के’ चक्रीवादळाचा प्रवास गोवा सिंधुदुर्गच्या दिशेने सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना रात्रभर पावसाने झोडपले. दरम्यान रात्री गोव्यातील म्हापसे मध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने हे झाड जळत होते. दरम्यान गोव्याच्या समुद्र किनारी धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

Toutke's cyclone
तौत्के’ चक्रीवादळ गोवा सिंधुदुर्गच्या दिशेने

By

Published : May 15, 2021, 10:47 AM IST

Updated : May 15, 2021, 12:43 PM IST

मुंबई -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम देखील जाणवू लागला आहे. वादळाचा प्रवास गोवा सिंधुदुर्गच्या दिशेने सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना रात्रभर पावसाने झोडपले. दरम्यान रात्री गोव्यातील म्हापसे मध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने हे झाड जळत होते. दरम्यान गोव्याच्या समुद्र किनारी धोक्याचा लाल निशाण लावण्यात आला आहे. तर पुण्यातून गोव्यात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

'तौक्ते’ चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या दिशेने

मुंबईत वाऱ्यासह तुरळक सरी -

मुंबई काल रात्री पासूनच या चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला होता. पूर्व, पश्चिम, मुंबई शहर या भागात गार वारा सुटला होता. त्यानंतर काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. ठगाळ वातावरणामुळे आज (शनिवार) सकाळी मुंबईकरांना सूर्य दर्शनही झाले नाही.

कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी -

लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. गुजरातच्या दिशेने हे चक्रीवादळ सरकत आहे. यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात ऑरेंज झोनही जारी करण्यात आला आहे.

दुपारनंतर ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे -

या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सतर्कता बाळगण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश -

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीला देखील धोका आहे यामुळे अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचा प्रभाव पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे आणि मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असा सूचनाही मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतली. त्यानंतर ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली.

सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, नारळाच्या झाडाला आग -

शुक्रवारी रात्री राज्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना पावसाने झोडपले. वादळी वारे आणि पावसामुळे सिंधुदुर्गात काही ठिकाणी झाडे कोसळली. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे झालेल्या वादळी वाऱ्यात तेथील विजेचे खांब आणि झाडे तुटून पडली आहेत. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. तर गोव्यातील म्हापसे येथे एका नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागली आहे.

वादळाचा प्रवास गोवा सिंधुदुर्गच्या दिशेने -

मालदीव आणि लक्षद्वीप येथून सुटलेले हे वादळ आज (शनिवार) गोवा आणि सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. यादरम्यान, सुमारे 70 ते 80 कि.मी. प्रतितास वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हे वादळ राज्यात आर्थिक नुकसान करू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊसाची शक्यता -

लक्षद्वीप येथून हे वादळ काल शुक्रवारी गोव्याच्या दिशेने निघाले आहे. ते सकाळी केरळ येथील कन्नूर येथे धडकेल. तेथून ते अरबी समुद्रात कर्नाटक आणि पुढे गोवा व महाराष्ट्रातील किनाऱ्यावर धडकणार आहे. काल शुक्रवारी त्याचे पडसाद गोव्यात आणि सिंधुदुर्गात दिसायला सुरूवात झाली. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या या वादळाचा वेग 50 ते 60 कि.मी. प्रतितास इतका आहे, पण हा वेग गोव्याच्या किनारपट्टीवर वाढणार असी शक्यता हवामान विभागान वर्तविली आहे.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश -

जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरीचे जिल्हाअधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी गुरूवारी आढावा बैठक घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे असे आदेश दिले होते. तसेच मागील निसर्ग चक्रीवादळातील कामगिरीप्रमाणे विविध पथकांच्या माध्यमातून येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करण्यास तयार व्हावे असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

हेही वाचा - माणुसकीची मान शरमेने झुकली! आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन मुलगा स्मशानभूमीत पोहचला

Last Updated : May 15, 2021, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details