महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबोलीत पर्यटनाला बंदी..तरीही नागरिकांची गर्दी, दोन दिवसांत २५ जणांवर कारवाई - Ban on visiting Amboli tourist spot

आंबोलीत पर्यटनाला बंदी असूनही गेले दोन दिवस पर्यटकांची पावले मुख्य धबधब्याकडे वळत आहेत.गेल्या दोन दिवसात २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळावर प्रशासनाने बंदी घातली आहे.

आंबोलीत पर्यटनस्थळ
आंबोलीत पर्यटनस्थळ

By

Published : Jun 21, 2021, 9:21 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील आंबोलीत पर्यटनाला बंदी असूनही गेले दोन दिवस पर्यटकांची पावले मुख्य धबधब्याकडे वळत आहेत. मात्र, पोलिसांनीही पर्यटकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. गेल्या दोन दिवसात २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळावर प्रशासनाने बंदी घातली आहे.

धबधबे प्रवाही होऊनही पर्यटकांना बंदी

आंबोलीत पावसाळी पर्यटन अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, गेली दोन वर्षे दरडी, कोरोना यामुळे पर्यटन बहरलेच नाही. यंदाही कोरोनामुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे धबधबे प्रवाही होऊनही पर्यटकांना बंदी आहे. अशा स्थितीतही काहीजण पर्यटनासाठी आंबोलीत येत आहेत. आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी सर्व वाहने थांबवून कडक तपासणी केली जाते. कोरोना अहवाल असल्याशिवाय कोणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. सावंतवाडी, गोवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून, त्यांना खाली पाठवले जाते. नंतर तेच प्रवासी मुख्य धबधबा तसेच अन्य ठिकाणी थांबून, पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात. त्यात जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे.

आंबोलीत पर्यटनाला बंदी, दोन दिवसांत २५ जणांवर कारवाई
बेधुंद पर्यटकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यटक आंबोलीत आले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी चेकपोस्टवरून माघारी पाठविले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या नेतृत्वाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दत्तात्रय देसाई यांनी सर्व पॉईंटवर जाऊन पाहणी करत, तेथील पर्यटकांना माघारी पाठवले. तर बेधुंद पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. आंबोलीतील पर्यटन स्थळे तसेच गेळे येथील कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद असल्याने तेथे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

आंबोलीत पोलीस बंदोबस्त तैनात

गेल्या दोन दिवसांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या नेतृत्वाखाली हवालदार दत्तात्रय देसाई, पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते, सहाय्यक उपनिरीक्षक बाबू तेली, हवालदार सुनील भोगण, कॉन्स्टेबल अभिजीत कांबळे, कॉन्स्टेबल राजेश नाईक, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस नाईक मयुर सावंत तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि होमगार्ड सध्या आंबोलीत तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी पर्यटन स्थळावर बंदी जाहीर करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details