महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित, अधिसुचना प्रसिद्ध - Conservation Reserve Zone in sindhudurg

जिल्ह्यातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात 29.53 चौरस किलोमिटर क्षेत्राला 'तिलारी संवर्धन राखीव'क्षेत्र म्हणून घोषित करणारी अधिसुचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे.

तिलारी
तिलारी

By

Published : Jun 25, 2020, 7:57 AM IST

सिंधुदूर्ग - जिल्ह्यातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात 29.53 चौरस किलोमिटर क्षेत्राला 'तिलारी संवर्धन राखीव'क्षेत्र म्हणून घोषित करणारी अधिसुचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा केली होती. वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझमचा प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार आता हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित झाले आहे.

तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

या परिसरात वाघ, हत्ती, बिबट, गवा, सांबर, पिसोरी, भेडकी, चौशिंगा आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर समृद्ध आहे. वन्यजीवांचा हा अधिवास संरक्षित होण्याच्यादृष्टीने या परिसराला संवर्धन राखीव घोषित करणे गरजेचे होते. मंगळवारी (दि. 23 जून) निर्गमित झालेल्या अधिसुचनेद्वारे त्यास मान्यता मिळाली असून आता जैवविविधता जपतांनाच या क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल.

अधिसुचनेनंतर आता हे क्षेत्र तिलारी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाईल. याचे एकूण क्षेत्र 2953.377 हेक्टर किंवा 29.53 चौरस किलोमिटर इतके राहणार आहे. तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून आधीच घोषित करण्यात आला आहे. आता तिलारी संवर्धन राखीवच्या घोषणेमुळे सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या वन वैभवात अधिकच भर पडली असून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार संधींची उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा -...तर रस्त्यावर उतरुन महामार्गाचे काम बंद पाडू, ठेकेदारांना नगराध्यक्षांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details